प्रिय कामगार बांधवांनो आणि भगिनींनो,
आवाहन
ऑफशोअरला काम करणारा प्रत्येक कर्मचारी हा केवळ ओएनजीसीसाठी काम करणारा कर्मचारी नसतो, तर तो आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभही असतो.
आपण महिनोन्महिने आपल्या घरापासून, मुलांपासून, आई-वडिलांपासून दूर राहून अत्यंत कठीण आणि जोखमीच्या परिस्थितीत काम करत असतो. समुद्राच्या मध्यभागी, मर्यादित साधनांमध्ये आणि मानसिक तणावात काम करताना आपल्या आरोग्याचा, मानसिक स्थितीचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
म्हणूनच ओएनजीसी कडून सुरू करण्यात आलेला “Wellness WeAVE – Offshore Wellness Survey” हा केवळ एक सर्वे नसून आपल्या भविष्याशी, सुरक्षिततेशी आणि कल्याणाशी जोडलेला अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे.
उद्या आपल्या कामाच्या अटी, मानसिक आरोग्य सुविधा, सुट्या, कुटुंबाशी संबंधित धोरणे आणि ऑफशोअरवरील वातावरण सुधारण्यासाठी जे काही निर्णय घेतले जातील, त्याचा पाया ह्या सर्वेवर उभा राहू शकतो.
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियनच्या वतीने सर्व ऑफशोअर कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन करण्यात येते की, कृपया मोठ्या संख्येने आपल्या ईमेल वर आलेल्या लिंक वर जाऊन या सर्वेमध्ये सहभाग नोंदवा आणि आपले मत प्रामाणिकपणे मांडावे.
लक्षात घ्या की, सदरील सर्वे मधील आपली ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे म्हणून बिनधास्तपणे आपण आपल्या हरकती नोंदवा, सूचना द्या.
आपण शांत राहिलो तर आपल्या अडचणी कागदावर कधीच दिसणार नाहीत. पण आपण एकत्रितपणे बोललो, तरच व्यवस्थापनाला आपल्या वास्तव परिस्थितीची जाणीव होईल.
लक्षात ठेवा जशी ओएनजीसीला आपल्या कामाची गरज आहे, तशीच आपल्या कुटुंबालाही आपल्या सुरक्षित आणि निरोगी उपस्थितीची गरज आहे. त्यामुळे हा सर्वे केवळ कंपनीसाठी नाही, तर आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आहे.
मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा.
आपला आवाज महत्त्वाचा आहे.
एकजूट हीच आपली ताकद आहे.
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन, मुंबई