“जेव्हा एखादा कामगार कर्मचारी श्रेणीतून अधिकारी पदावर जातो,
तेव्हा तो प्रवास सोपा नसतो.
त्यात वर्षांची मेहनत, कौटुंबिक त्याग आणि युनियनच्या माध्यमातून दिलेला लढा देखील असतो.”

२०११, २०१३ आणि २०१५… ही केवळ वर्षं नाहीत, तर ओएनजीसीच्या अंगणात आपण एकत्र पेरलेल्या स्वप्नांची आणि संघर्षाची सुरुवात होती.
याच वर्षांमध्ये आपल्या कर्मचारी श्रेणीत रुजू झालेले आपले अनेक खंदे शिलेदार या वर्षीच्या PLT (Promotion Linked Transfer) प्रक्रियेमुळे मुंबई रिजनमधून देशाच्या विविध कानाकोपऱ्यांत नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी रवाना होत आहेत.

एका प्रदीर्घ, अविस्मरणीय प्रवासाची सांगता करत, डोळ्यांत भविष्याची स्वप्ने आणि आठवणींचे गाठोडे घेऊन आपण नव्या कार्यस्थळाकडे पाऊल टाकत आहात.

हा केवळ प्रशासकीय बदल नाही;
हा तुमच्या घामाचा, तुम्ही घेतलेल्या कष्टांचा आणि अविरत केलेल्या समर्पणाचा मिळालेला एक हक्काचा सन्मान आहे !!

कर्मचारी श्रेणीतील तुमच्यासारख्या लढवय्या सहकाऱ्यांच्या ताकदीमुळेच आपली युनियन आज इतकी सक्षम, सजग आणि वज्रमुठीसारखी बलशाली बनली आहे.
व्यवस्थापनाशी दोन हात करताना, हक्काच्या लढाईत आपण खांद्याला खांदा लावून लढलो. अनेक संघर्षांत आपण एकजुटीने आवाज उठवला आणि त्या प्रत्येक कठीण प्रसंगात तुमचे योगदान अनमोल राहिले.

युनियन ही केवळ कागदावर शाहीने उमटवलेली संघटना नसते,
ती कामगारांच्या रक्ताने, घामाने, विश्वासाने आणि संघर्षाने उभी राहिलेली एक जिवंत शक्ती असते आणि तुम्ही या शक्तीचा सर्वात मजबूत आणि अविभाज्य कणा होतात आणि अविरत राहाल !!

आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे !!

आज तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने पदोन्नती (Promotion) मिळवून अधिकारी पदावर पोहोचला आहात,
ही आपल्या युनियनसाठी अभिमानाची बाब आहे. कालपर्यंत कामगारांचे हक्क सुरक्षित राहावेत म्हणून मैदानात उतरणारे तुम्ही, आज अधिकारी म्हणून नव्या भूमिकेत जात आहात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

तुमच्या या दैदिप्यमान प्रवासासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!! आणि इतकी वर्षे युनियनसाठी दिलेल्या नि:स्वार्थ योगदानाबद्दल व अतुट साथीबद्दल ‘पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन’ कडून आपल्या सर्वांचे मनस्वी आभार!!

नवे अंगण… नवी आव्हाने… नवी संधी व नवा सन्मान…

तुम्ही जिथे जाल, तिथे आपल्या संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा झेंडा असाच उंच फडकत ठेवाल, ह्याचा आम्हांला पूर्ण विश्वास आहे. तुमच्या पुढील प्रत्येक वाटचालीस, प्रगतीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन परिवाराकडून क्रांतिकारी आणि संघर्षमयी शुभेच्छा!

“श्रम की बूंदों से जिसने, नया इतिहास रचा है, सागर की लहरों पर, जिसका नाम बचा है।
चलो चलें कि अभी पथ बहुत शेष है, ऊर्जा के इस महाकुंभ में, हमारा योगदान विशेष है!”

शुभेच्छुक :

– पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.