प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आपल्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन सदैव कटिबद्ध राहिली आहे. आज युनियनच्या वतीने जनरल सेक्रेटरी मा. वैभव लवेकर साहेब, उपाध्यक्ष मा. सुरेश ननवरे साहेब, डेप्युटी जनरल सेक्रेटरी श्री. ख्वाजा शेख साहेब व डेप्युटी जनरल सेक्रेटरी श्री.दत्ता तावडे साहेब आणि टीम यांनी रिग मॅनेजर सागर किरण, सागर शक्ती तसेच लोकेशन मॅनेजर श्री. राकेश गुप्ता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रिगवरील ज्वलंत प्रश्नांवर थेटपणे जाब विचारला. (सागर उदयचे रिग मॅनेजर सध्या प्रशिक्षणासाठी गेले असल्याने ते अनुपस्थित होते.)

या चर्चेत कामगारांचा प्रलंबित ओव्हरटाईम, अन्यायकारक बदल्या (Unjustified Transfer) आणि प्रशासनाच्या कामगारविरोधी धोरणांवर युनियनने आक्रमक भूमिका मांडली. केवळ पोकळ आश्वासने नको तर या सर्व समस्यांवर ‘तात्काळ आणि ठोस तोडगा’च हवा, हा आमचा स्पष्ट इशारा आहे. आमच्या या भूमिकेनंतर व्यवस्थापनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व मुद्द्यांवर सकारात्मक आणि जलद निर्णयाचे आश्वासन दिले आहे.

तसेच, काल वेस्टर्न ऑफशोअर युनिटचे अध्यक्ष श्री. अजय शर्मा सर आणि श्री. भास्कर चौधरी नित्तम साहेब, ED MH Asset यांची भेट घेऊन व्यवस्थापनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. NQO येथील दुर्दैवी अपघात आणि SHP प्लॅटफॉर्म वरील धोकादायक गॅस गळती या घटना नसून व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचा कळस आहे, हे युनियनच्या वतीने ठामपणे निक्षून सांगितले. ऑफशोअर सेफ्टी आणि चौकशी समितीच्या संथ कामकाजावर कठोर प्रश्न उपस्थित करून, या सर्व प्रकरणांतील दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही नोंदवली आहे.

या संकटात जीव धोक्यात घालून लढणाऱ्या फायर फायटिंग टीमच्या शौर्याचा अधिकृत गौरव व्हावा, ही आपली प्रमुख मागणी होती. कामगारांच्या हक्कांसाठीचा हा लढा आता केवळ शब्दांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो प्रत्यक्ष मैदानात उतरून लढला जाईलच आणि आपल्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत आपली ही पावले मागे हटणार नाहीत.

धन्यवाद,
वैभव एम. लवेकर,
जनरल सेक्रेटरी,
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
(मान्यताप्राप्त युनियन)
डब्ल्यू. ओ. यु, ओएनजीसी मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.